पाऊस,मुंबई आणि ट्रेक्किंगच नात काहि अजोड आहे. म्हणजे मी काही सर्वे केलेला नाहि पण,पाच पन्नास छोटे मोठे ट्रेक्किंग ग्रुप मुंबई च्या आसपास कर्यरत असावेत.हया पावसाची आणि ट्रेक्किंग ची मजा, सैह्याद्रिच्या प्रेमात पडलेल्या त्या वेडया वानर वीरांनाच माहित.
12ची बस म्हंणजे तसा ऊशीर व्हायची काहि गरज नाही. पण काय करणार, जेवून आणि गाडीच वेलपत्रक सांभाळून वसईला पोहोचायला 12:30 झालेच.कल्पेश आणि सगळी जमा झालेली मंडळी चांगलीच वैतागली असणार. अर्थात आम्ही पोहोचल्यावर रीतसर माफी वगैरे मगितली आणि मामला तिथेच पटवला.
हळू हळू डुलकी काढत आम्ही घोडबंदर मार्गे highway पकडला. मधेच थोडा डोळा लागला आणि कधी लोणावळा आला ते कळला सुद्धा नाही. थोडे पाय मोकळे करून आणि प्रातर विधी आटोपून पुढचा प्रवास चालू झाला. मस्त काळोखी पहाट. सकाळचे ५ वगैरे वाजले असावेत. बुशी dam च्या रोडला गाडी लागली आणि उजव्या बाजूला लांबलचक ब्रिटीश काळातील एक धरण दिसलं. विनयने मग आधी त्या धरणाच पाणी इंजीनसाठी आणि नंतर पिण्याच्या पाण्यासाठी कसे वापरले जायचे त्याची माहिती दिली.
पूढच्या रस्त्याला धुक्याने वेटोळा घातला होता. ड्रायवर आणि आम्ही जीव मुठीत घेवून पुढची मार्गक्रमणा करत होतो. झोप तर चांगलीच उडली. वळणावळणाचा रस्ता, धुक्याचा जाड पडदा, रिमझिम पाउस, थोडी भीती, थोडी मजा, एक थोडीशी नजर चूक आणि गाडीने वर कोरीगड ऐवजी, खाली Amby valley चा रस्ता धरला असता, अर्रे नाही sorry, बनवला असता :)
समोरच्या डोगर दरया, श्रावण सरींनी नटलेली हिरवी हिरवी झाड, सगल पाहिल कि मन एका झटक्यात सगळ्या पोटापाण्याच्या आणि रहाटगाडाग्याच्या चिंता विसरुन जातात. लक्षात येत कि आपण या रोजच्या धाकधाकीपासून किती दूर आलोय. रोजच्या जीवनात दिसते ती ट्रेनची गर्दी, रोडवरचा ट्राफिक जॅम, प्रोजेक्टच्या deadlines, वर्तमानपत्रात रोजच्या रोज येणारे भ्रष्ट politicians चे घोटाळे. पण यार खूष राहायला, शांती समाधानाने आयुष्य जगायला नक्की काय पाहिजे. फार काही नाही. खर तर फारच थोडक. आणि हे सगळा सुचत होत, नाही उमजत होत ते रमत गमत गाई, बैलांना हाकत चाललेल्या त्या गुराख्याकडे पाहून.
काल पर्यंत त्या रहाटगाडाग्याच्या चिंतेत अडकलेला मी, नवीन प्रोजेक्ट च्या चिंतेत असलेलेला, increment cycle जावूनही पगार न वाढल्यामुळे थोडा चिंतेत असलेलेला, global slowdown मुळे आणि प्रोजेक्ट्स कमी झाल्यामुळे, एकंदर software व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्यामुळे भांबावून गेलेलेला. पण गम्मत पहा, एका मिनिटात ते सगळ गौण वाटायला लागल. पटकन विसरूनही गेलो.
तर हा असा निसर्ग, आपण कितीही दूर जावूदेत, कितीही practical वैगैरे होण्याची मित्थ्या बडबड करूदेत, कितीही technological प्रगती करूदेत, शेवटी ती मनाची शांती आणि मुक्त आकाशात भरारी मारण्यासारखा आनंद कुठे मिळतो. ह्या डोंगरांच्या कुशीतच ना. बस फक्त सगळ्या चिंता बाजूला सारून, आपल्या आवडीच्या trekker group बरोबर निघून यायच आणि निसर्गाच्या कुशीत सगळी चिंता उडवून टाकायची आणि करायची फक्त आणि मुक्त धम्माल, अगदी थोडा वेळ का होईना, पण आपल्या हक्काची मजा.
मस्त पैकी फक्कड चहा, वेज प्याटिसने पोटाला आणि मनालाही चांगलच ताजतवानं केलं. ओढ लागली होती ती धुक्याची दुलई ओढण्याची, रान फुलांचा वास घेण्याची, दाट जंगलात हरवून जाण्याची आणि हिरवळीवर बसून गप्पा ,मारण्याची, poses देवून photography करण्याची, हिरव्या हिरव्या गार गालिच्यावर फुलराणी कुठे दिसते हे पाहण्याची. मला भाऊ कविता वगैरे काही करता येत नाहीत. पण बालपणीच्या काही कविता मनाच्या मातीत अशा काही रुजलेल्या आहेत, कि उखडून काढणेही अशक्य.
आयुष्याच्या फास्ट ट्रेन मध्ये बसलेले असताना, आणि पटापट स्टेशन्स येवून जात असताना, काही स्टेशन्सवरचे असे काही क्षण असेच लक्षात राहतात. VAC (Vasai Adventure Club ) ने दिलेले प्याटिस खाताना एखादा extra प्याटिस मिळाला तरी त्या वेळी त्यात जब्बर धम्माल वाटते. छोट्या छोट्या गोष्टीत मज्जा वाटते आणि हसायला विसरलेली कित्तेक माणसं पोट धरधरून हसताना दिसतात.
वाटोळ्यांमध्ये उभे राहून, ओळखी पालखी झाल्यावर आणि हर हर महादेवच्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या गर्जंना झाल्यावर, आम्ही सारे मावळे गड सर करायला मार्गस्थ झालो. लाल माती, श्रावण सरींनी ओली झालेली जमीन, दूर धुक्याच्या मागे लपंडाव खेळणारा कोरीगढचा कडा आणि आजूबाजूला सर्वत्र पसरलेलं, हिरवाईन नटलेल, गार वाऱ्याच्या झुळकीन मन शांत करणार, धुंद सरींनी मनाला आणि शरीराला ओल करणार माळरान आणि दाट जंगल.
श्रावणमासी हर्ष मानसी करत डुलत डुलत चालणारे नितांत आणि मानसी, आत्ताच लग्न झालेले असल्यामुळे अर्थात सर्वांच्या थट्टा मस्करीचे केंद्र असलेले. Digital कॅमेऱ्याची compitition, झूम करून रान फुलाचं सौंदर्य टिपण्याचे धडपड करणारे काही कॅमेरापटू. फक्त साडेसात वाजलेले असल्यामुळे वेळेची चिंता नव्हती.
गडाच्या कच्च्या पायऱ्यांवरून वाहणारे, नव्हे झूळंझूळणारे प्रवाही पाणी, अगदी प्रवाही आयुष्यासारखं, कुठेही न थांबणार, आणि सतत वाहत राहणार. सर्वत्र पसरलेला रान फुलांचा गालीचा मन मोहवत होता. तटाच्या भिंतींवर पसरलेले रानवेलही नाजूक-साजूक, जांभळी-गुलाबी, ईटुकली-पिटुकली फुलं ल्यायले होते. सर्व काही मंत्र मुग्ध करणारे. असल्या वातावरणात मग कसल्या चिंता मनाला शिवणार हो. नाही त्या पळून जातात एकदम लांब.
जाताना दिसणारा पवना dam चा जलाशय, ambi valley चा नयनरम्य परिसर आणि लांबवर दिसणारी छोटी छोटी गावं, फक्त ध्यान मुग्ध होवून पहात बसाव असं. कुठचा कॅमेरा हि ईतकी नवलाई memory कार्ड मध्ये बंद करणार, फारच कठीण.
अगदी तासाभरात आम्ही वर पोहोचलो असू, धुक्याने सर्वत्र दुधी रंगाच्या भिंत्ती उभ्या केलेल्या होत्या. त्या मुळे गडाचे दर्शन, ते ज्या angle ने मिळेल तेच द्रुश्य मनात साठवत होतो. गडावर चारही बाजूंच्या अजूनही पूर्ण शाबूत असलेल्या ताटावरून पूर्ण एक चक्कर मारली तरी गडाच पूर्ण चित्र उभं करणं कठीण. हिंदी फिल्म मधल्या एखाद्या suspense scene साठी, किव्वा एखाद्या romantic गाण्यासाठी साजेसा माहोल. दीड दोन फुटांवरच कसबस जे दिसते ते पाहत, एकमेकांना कुठे आहेत ते चाचपण्यासाठी "येवो~~", "येवो~~" च्या आरोळ्या ठोकत वरची तीन देवळ देखीन पाहून घेतली. तीनही देवळ आता नीट बांधलेली आहेत. गणपतीच्या देवळाच्यापाठि तर भला मोठा तलाव देखील आहे. नमस्कार करून आम्ही कोरीदेविच्या देवालयाच्या बाहेर जेवणासाठी पथारी पसरली.
चांगली कडकडीत भूक हि काय असते ते ट्रेकला गेल्या शिवाय नाही कळंत. आणि मग झुणका भाकर काय किव्वा बटाटयाच्याच्या भाजीचा sandwitch काय सगळीच चव अमृत. श्रावणाची पासपोस नसलेले तर झिंगे आणि तंगडी तोडत होते. पण काही म्हणा कुठलीही अंग मेहनत करून मग जेवल तर जेवणाला काही वेगळीच चव येते. आणि मग बाजूचा निसर्ग असा सुंदर सजलेला असेल तर आणखीनच मजा.
पोटपूजा झाल्यावर आणि आणखी फ्रेश झाल्यावर आमची दुसऱ्या phase ची पदभ्रमंती सुरू झाली. हलका पाऊस अंगावर झेलत आम्ही तटाला प्रदक्षिणा घातली, अगदी अजूनही भक्कम असलेला, चांगला दीड पुरुष रुंदीचा हा तट म्हणजे ह्या गडाचे अभेदयतेचे लक्षण. इंग्रजाना खूप झुंज देवूनही हाती पडला नव्हता. शेवटी एक तोफ गोळा दारूच्या कोठारावर पडला आणि किल्ल्याचा भाग्य फिरलं. किल्ला फिरंग्यांच्या हाती लागला.
मधेच धुकं बाजूला सरला कि खाली उतरणारा कडा आणि ओसंडून वहणारे धबधबे दिसत होते. फारच कमी वेळात ते कॅमेरयात बंद करताना चांगलीच भंबेरी उडाली. किल्ल्यावर अजून एक तोफ
देखील शाबूत आहे आणि आश्चर्य म्हणजे खूपच चांगल्या स्थितीत आहे.
मन भरून किल्ला फिरल्यानंतर आणि, धुक्याच्या दुलईत दिवस घालवल्यावर, परतीची वेळ आली. प्रसन्न झालेले आणि पावसाच्या गार पाण्याने आनंदित झालेले आम्ही किल्ल्याचा निरोप घेवून परतीच्या प्रवासाला लागलो. पावसाचे मन मात्र पूर्ण भरलेले न्हव्हते. त्याला आम्हाला चिंब करायचेच होते. नंतर सुरू झालेल्या जोरदार सरींनी पूर्ण चिंब करून टाकले.
श्रावण सरींनी पूर्ण न्हावून निघालेले सगळे ट्रेकर्स , raincoats आणि rain cheaters बाजूला सारून फक्त भिजण्याचा आनंद लुटत होते. पावसाचा धबधबा असा अभाळातूनच पडू लागल्यावर, बुशी डँमला जायची गरजच काय हो. ऐकूण भलतीच धमाल आली.
लवकर निघूनही बुशी डँमच traffic काही चुकल नाही. मुंबई पुण्याची, बुशी डँम फँन मंडळी गाड्या बसेस नि तिथे सांडली होती. १०-२० रुपयांचे changing room चे notice boards वाचून मजा वाटत होती.
खंडाळ्याला थोडा नाश्ता केल्यावर लक्ष गेला ते egg sunday च्या window कडे. egg कटोरी, egg sandwitches, scambled egg, mushroom cheese omlete, egg biryani असे काही आधी ऐकलेले आणि काही नवीन प्रकार पाहत होतो. अर्थात बारीक शरीर यष्टी असली तरी खायच्या बाबतीत नवीन गोष्टींचा आस्वाद घ्यायला मला खूप आवडते. तसा मी एग्ग भुर्जी चा फँन. लक्षात आल कि वडापाव बरोबर बरीचशी मुंबई ह्या अंड्यांवर देखील अवलंबून आहे. रस्त्याच्या कडेला मांडलेल्या boiled eggs आणि भुर्जी omlete, पाव च्या टपरया भरभरून गिऱ्हाईक खेचतात.
होस्टेलच्या वास्तवात वडाळ्याला परीक्षेच्या काळात आम्ही जे रात्री ३ वाजताही भुर्जी पाव खायला जायचो त्याची आठवण जागी झाली. मामाच्या उंबरगोठणच्या हॉटेल बाहेरील झणझणीत हिरव्या मिरच्या घातलेला omlete पाव, नंतर मागाहून समजलेला, अंड्यात बुडवून shallow fry केलेला french bread, वाह क्या बात है !! आठवणीनेही मजा आली. श्रावणाच्या sunday ला egg sunday च्या receipes discuss केल्यावर आणि घरी गेल्यावर try करण्याचे promise घेतल्यावर, आमची खवैय्यांची गाडी मग आजूबाजूच्या निसर्गावर, खंडाळ्याच्या bunglows वर आणि ट्रेक मध्ये केलेल्या माजेवर वळली
एकूण बऱ्याच काळाने केलेला, भरपूर पावसाची मजा असलेला, हिरवाईने नटलेला आणि खूपश्या जुन्या नवीन मित्र मंडळींनी लक्षात राहील असा हा कोरीगढ चा ट्रेक. facebook वर फोटो uploaded आहेत. पण येथे थोडे टाकतोच आहे. जरूर जा आणि खूप मजा करा.